सावंतवाडी ,दि.२६ ऑगस्ट
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी उद्या, गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या लोकमान्य सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या पुढाकाराने ही बैठक होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. तसेच गणेशमूर्ती, रोषणाई व पूजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचीही दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगची योग्य सोय करणे आणि विक्रेत्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे.
सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत असतानाच, गणेशोत्सव सुरळीत आणि उत्साहात पार पडावा यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.