सावंतवाडी : आरोंदा-मळेवाड मुख्य रस्त्यावर विद्युत वाहिनी तुटून थेट रस्त्यावर

शेअर करा

सावंतवाडी,दि.२५ ऑगस्ट

आरोंदा-मळेवाड मुख्य रस्त्यावर आरोंदा हायस्कूलच्या गेटसमोर विद्युत पुरवठा करणारी वाहिनी आज सायंकाळी साडे पाच च्या सुमारास अचानक तुटून रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना घडली त्यावेळी हायस्कूल सुटलेले असल्याने विद्यार्थी घरी गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आरोंदा हायस्कूलच्या गेटलगत असलेल्या विद्युत पोलवरील वाहिनी तुटून थेट रस्त्यावर पडली. याच वेळी आरोंदा येथून मळेवाडच्या दिशेने जाणारे पत्रकार मदन मुरकर यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील जितेंद्र जाधव तसेच ग्रामस्थांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील श्री. जाधव व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
घटनेची माहिती मिळताच लाईनमन राजू मरडे, वायरमन ओंकार लिंगे, विश्राम पोखरे व दादा आचरेकर यांनी विद्युत पुरवठा बंद करून घटनास्थळी धाव घेतली. भर पावसात त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नवीन निवजेकर, मदन मुरकर तसेच ग्रामस्थांनीही विद्युत कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
दरम्यान, विद्युत वाहिन्यांवर वाढलेली झाडी-झुडपे तसेच जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्यांमुळे अशा घटना घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विद्युत विभागाने जीर्ण झालेल्या वाहिन्या तातडीने बदलून विद्युत वाहिन्यांलगतची झाडी-झुडपे साफ करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेअर करा