सावंतवाडी ,दि.२६ ऑगस्ट
बालरोगतज्ञ आणि सेवाव्रती व्यक्तिमत्त्व डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मळगाव येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात पार पडलेल्या या सभेला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमप्रारंभी वाचन मंदिराच्या कार्यवाह सौ. स्नेहा खानोलकर यांनी प्रास्ताविक करताना डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. या प्रसंगी सेवानिवृत्त प्रा. सुभाष गोवेकर, सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, लेखक-कवी प्रकाश तेंडुलकर, समाज कल्याण भूषण चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच आनंद देवळी आणि वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
वक्त्यांनी डॉ. खानोलकर यांच्या वैद्यकीय कौशल्याचा, प्रेमळ स्वभावाचा आणि गोरगरीब रुग्णांप्रती असलेल्या सेवाभावाचा विशेष उल्लेख केला. आयुष्यभर रुग्णसेवेला ईश्वरसेवा मानून मळगाव व सावंतवाडी परिसरातील बालकांना आरोग्यसेवा देणाऱ्या या ऋषितुल्य डॉक्टरांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. भावपूर्ण वातावरणात या सभेची सांगता झाली.