सावंतवाडी,दि.२६ ऑगस्ट
आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल प्रशालेच्या छप्पराचा काही भाग मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत छप्पराची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम करून दिले.
माजी विद्यार्थी वासुदेव सावंत, प्रभाकर (पबी) कळसुलकर, भाऊ रेवाडकर, बाळकृष्ण हळदणकर (सहसचिव, माजी विद्यार्थी संघ), दत्तप्रसाद प्रभू (सदस्य, शाळा समिती), शशिकांत मुळीक (प्रशालेचे माजी कर्मचारी) व संकेत गावडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत छप्पर दुरुस्तीचे काम पूर्ण करून दिले. प्रशालेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे काम कोणतीही अपेक्षा न ठेवता करण्यात आले.
तसेच ‘आम्ही वर्ग मित्र’ ग्रुपचे सदस्य दिनानाथ काळोजी यांनी शाळेच्या परिसरात वाढलेली झाडी – चारा कटरच्या साहाय्याने साफ करून दिली.
माजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी संघ व शाळा समितीकडून प्रशालेच्या विकासासाठी मिळणारे सहकार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीतून ‘माझी शाळा – माझी जबाबदारी’ ही भावना अधिक दृढ होत असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी सांगितले. प्रशालेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.