सावंतवाडी : गावाच्या आर्थिक सुबत्तेचा मार्ग म्हणजे, विविध कार्यकारी संस्था : मनीष दळवी.

शेअर करा

वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

सावंतवाडी,दि.०८ सप्टेंबर

गावाच्या विकासाच्या वाटचालीत सहकार हा आर्थिक कणा मानला जातो. याच सहकाराच्या बळावर वेत्ये गावाने उभारलेली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची नूतन वास्तू आज गावाच्या आर्थिक प्रगतीच्या नव्या पर्वाची साक्षीदार ठरली. सभासदांच्या अथक परिश्रमातून आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साकारलेल्या या वास्तूचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
स्वतःच्या मालकीची वास्तू उभी राहणे हा संस्थेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण असतो.
“गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विकास संस्था महत्त्वाची आहे. संस्थेची स्वतःच्या मालकीची वास्तू आज उभी राहिली, हा क्षण निश्चितच ऐतिहासिक आहे. पुढील वाटचालीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. संस्थेला शून्य टक्के व्याजदराने आर्थिक मदत करण्याबरोबरच डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करण्यासाठीही आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

नूतन वास्तूमुळे संस्थेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याबरोबरच सभासद, शेतकरी आणि ग्रामस्थांना विविध सहकारी सेवा अधिक सुलभ व सक्षम पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ही वास्तू केवळ विटा-मातीची इमारत नसून वेळयेच्या सहकार चळवळीला नवी दिशा देणारे आर्थिक केंद्र ठरणार आहे.

यावेळी उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुमिता जाधव, जिल्हा बँक संचालक रवींद्र मुळगावकर, विद्याधर परब, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, सरपंच गुणाजी गावडे, संस्थेचे अध्यक्ष रमेश गावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष रमेश यशवंत गावकर, उपाध्यक्ष यशवंत दत्तात्रय गावकर, गटसचिव अर्जुन वासुदेव गावकर तसेच संचालक मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

शेअर करा