रस्त्यालगत वाढलेल्या झाडीमुळेही धोका; तातडीने गतिरोधक बसवून झाडी साफ करण्याची संजय लाड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी.
सावंतवाडी ,दि.२४ जून
वेंगुर्ले-बेळगाव या मुख्य मार्गावरील बुर्डी-पूल ते दाणोली दरम्यान वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली असून, गतिरोधकांचा अभाव आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर माडखोलचे माजी सदस्य संजय लाड यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन या मार्गावर तातडीने गतिरोधक बसवण्याची व रस्त्यालगतची झाडी साफ करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात संजय लाड यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ले-बेळगाव रस्त्यावरील बुडी-पूल ते दाणोली दरम्यान असलेल्या माडखोल बाजार फुगीवाडी, धवडकी माडखोल तसेच दाणोली बाजार येथे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने गतिरोधक घालणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे माडखोल बाजार फुगीवाडी ते कारीवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुगीवाडी फाट्यापासून ५० ते १०० मीटरच्या अंतरावर गतिरोधक उभारण्यात यावा, जेणेकरून वेगाने जाणाऱ्या वाहनांना चाप बसेल. या परिसरात गतिरोधक नसल्याने व वाहने अनियंत्रित गतीने धावत असल्याने यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या रस्त्याच्या वळणांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून, त्यामुळे समोरून येणारे वाहन चालकांच्या दृष्टीस पडत नाही. ही वाढलेली झाडी अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने ती तात्काळ हटवण्यात यावी. गतिरोधकांचा अभाव आणि वाढलेल्या झाडीमुळे यापुढे कोणताही अपघात घडल्यास त्याला संबंधित विभागच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
या मुख्य मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने पायी ये-जा करतात. रस्त्याच्या डांबरीकरणापासून किमान एक मीटरची बाजू पादचाऱ्यांसाठी साफ असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या रस्त्याच्या बाजूला झाडी आणि कचरा वाढल्याने पादचाऱ्यांना थेट मुख्य रस्त्यावरूनच चालावे लागते. जेव्हा एकाच वेळी दोन दुचाकी किंवा चारचाकी वाहने समोरासमोर येतात, तेव्हा रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बाजूला व्हावे लागते. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या बाजूची जागा तात्काळ साफ करण्यात यावी, अशी आग्रही मागणी संजय लाड यांनी केली आहे.