​सावंतवाडी : गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी-आंबोली मार्गावरील झाडी छाटण्याची मागणी

शेअर करा

रस्त्यावरील वाढलेली झाडी हटवून मार्ग सुस्थितीत करण्याची काँग्रेस तालुकाध्यक्षांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

​सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील दुतर्फा वाढलेली झाडी छाटून, साईडपट्ट्यांवरील गवत साफ करावे आणि रस्ते वाहन चालवण्यायोग्य सुस्थितीत आणावेत, अशी मागणी सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय घनःश्याम मालवणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
​सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, दाणोली, माडखोल, बुर्डी पूल ते सावंतवाडी या मार्गांवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी व गवत वाढले आहे. यामुळे वाहनचालकांना रस्ता स्पष्ट न दिसल्याने वाहन चालवणे कठीण बनले आहे. या मार्गांवर दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते, तसेच गणेशोत्सवासाठी मुंबई व इतर ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
​चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी संबंधित रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी व साईडपट्ट्यांवरील गवत तात्काळ साफ करून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
​या निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांच्यासह पीटर फर्नांडिस, आनंद आयरे, आफताब हारेकर, संतोष तावडे, प्रदीप चौगुले, संदीप सुकी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी येथील आवक लिपीकांकडे सुपूर्द करण्यात आले.

शेअर करा