स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचा मानस… उदय भोसले
कबड्डी पंच शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद… सुरेश गवस
सावंतवाडी,दि.२७ जुलै
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्ताने सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने सावंतवाडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय पंच शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, तालुकाध्यक्ष उदय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, डॉ. तुषार भोसले, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे पदाधिकारी संजय पेडणेकर, दिनेश चव्हाण, नितीन हडकर, राष्ट्रीय पंच किशोर पाताडे, जयेश परब, पंचमंडळ सदस्य हेमंत गावडे, वैभव कोंडस्कर, संयोजन समिती सदस्य अजय जाधव, राजू बंगे, कृष्णा सावंत ,राज्य पंच प्रथमेश सावंत, रेनॉल्ड बुतेलो आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्याभरातून ३५ शिबिरार्थी शिबिरासाठी उपस्थित होते.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेमध्ये शिबिराचा हेतू विशद करताना दिनेश चव्हाण स्पष्ट केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी स्वर्गीय दादांच्या कार्याचे विविध पैलू उलगडताना सांगितले की, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांवर, रोजगार, शेती, उद्योगधंदे, क्रीडा व शिक्षण अशा अनेक विषयांवरील त्यांचा अभ्यास दांडगा होता. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा ध्यास होता आणि त्यासाठी ते स्वतःला झोकून देत असत. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कबड्डी खेळासोबतच महाराष्ट्रातील मैदानी खेळांनाही त्यांनी राजाश्रय निर्माण करून दिला होता. आम्ही जेव्हा-जेव्हा दादांना भेटायला जायचो, तेव्हा ते प्रथम क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वेळ द्यायचे आणि त्यानंतर आमच्या बैठका व्हायच्या. त्यामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे व्हिजन किती व्यापक होते, हे दिसून येते. स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त भव्य-दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संजय पेडणेकर यांनी स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना २०११ मध्ये झालेल्या चौथ्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेची आठवण करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच श्री जयेश परब व श्री किशोर पाताडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमंत गावडे यांनी केले. शिबिरासाठी उपस्थित सर्व पंचांना जिल्हा पंचमंडळाच्या वतीने शिबिर कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे दिवसभरात आवश्यक कबड्डी नियमांवर व सिग्नलिंग, व्हिसलिंग व प्रात्यक्षिकांवर मार्गदर्शन करण्यात आले.