सावंतवाडी : कोमसापच्या सिंधुदुर्ग नाट्य शाखा समितीवर चार कलाकारांची निवड

शेअर करा

सावंतवाडी,दि.३१ ऑगस्ट
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार ‘कोमसाप’ची नवीन नाट्य शाखा स्थापन करण्यात आली आहे. या नाट्य शाखा समितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार कलाकारांची निवड करण्यात आली असून, जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या नावांची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला.


​महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, नाटककार तथा ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी या नाट्यशाखा समितीची घोषणा केली. यामध्ये अभय खडपकर (कणकवली), सौ. वर्षा वैद्य (कुडाळ), संजय शिंदे (मालवण) आणि अभिनेते-दिग्दर्शक बाळ (दत्तात्रेय) पुराणिक (सावंतवाडी) यांचा समावेश आहे.


​१७५ वर्षांची परंपरा असलेली संगीत नाट्यकला जोपासण्याचे कार्य बाळ पुराणिक करत आहेत. वर्षा वैद्य यांनी बालनाट्य व विविध नाटकांतून अभिनय करत एकांकिका स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. संजय शिंदे हे नाट्य दिग्दर्शक, लेखक व कलाकार म्हणून कार्यरत आहेत, तर अभय खडपकर यांनी नाट्य व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या सर्व कलाकारांच्या कार्यात ‘कोमसाप’ पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही प्रदीप ढवळ यांनी दिली.


​यावेळी बैठकीत नवनिर्वाचित सदस्य वर्षा वैद्य व बाळ पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. संतोष सावंत, रुजारिओ पिंटो, खजिनदार अनंत वैद्य, अभिमन्यू लोंढे, सुरेश पवार, संतोष वालावलकर, दिपाली काजरेकर, वृंदा कांबळी, संदीप वालावलकर, दीपक पटेकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा