ग्रामस्थांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली
सावंतवाडी,दि.१५ ऑगस्ट
माजगावचे वीर सुपुत्र आणि भारतीय नौदलातील शहीद नौसैनिक शुभम अक्षता उदय सावंत यांच्या पुतळ्याचे १५ ऑगस्ट रोजी माजगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात अनावरण करण्यात आले.
ऑक्टोबर २०१४ मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आलेल्या ‘हुदहुद’ चक्रीवादळादरम्यान राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन रिलीफ’ मध्ये मदतकार्य करताना अवघ्या २० व्या वर्षी शुभम सावंत यांना वीरमरण आले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचा आणि स्मृतींचा वारसा जपण्यासाठी माजगाव ग्रामपंचायतीने हा पुतळा उभारला आहे.
दिग्गजांची उपस्थिती आणि सत्कार
सकाळी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल (डॉ.) रत्नेश सिन्हा (निवृत्त) यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. या प्रसंगी माजी सैनिकांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद शुभम यांना मानवंदना दिली.
विशेष सत्कार: वीरपिता उदय सावंत, वीरमाता अक्षता सावंत, तसेच माजगाव खोतवाडा येथील वीरपत्नी तिलोत्तमा दीपक सावंत यांचा शाल, श्रीफळ आणि नारळाचे रोप देऊन गौरव करण्यात आला.
कलाकाराचा सन्मान: शहीद शुभम सावंत यांचा देखणा पुतळा साकारणारे माजगाव खोतवाडा येथील मूर्तिकार काका सावंत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत व पाहुणे: सरपंच रंजना कानसे, उपसरपंच रिचर्ड डिमेलो आणि सदस्यांनी निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत व उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार केला.
तरुणांना देशसेवेचे आवाहन
आपल्या भाषणात डॉ. रत्नेश सिन्हा यांनी सैनिक जीवनातील विविध अनुभव मांडले. तर निवृत्त सुभेदार मेजर संजय सावंत यांनी तरुण पिढीने आयुष्यात विशिष्ट ध्येय (फोकस) ठेवून जिद्दीने काम करण्याचे आवाहन केले. माजगावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सैन्यदलात भरती व्हावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, निवृत्त पोलिस प्रभाकर सावंत, सी. ए. लक्ष्मण नाईक, ग्रामस्थ, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सरपंच रंजना कानसे यांनी मानले.