सावंतवाडी,दि.२८ जुलै
पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणात कवींच्या शब्दांचा आणि सुरांचा आस्वाद घेण्याची नामी संधी मळगाववासीयांना मिळणार आहे. कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी ‘काव्यांजली’ या विशेष काव्य व गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयातील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात पार पडेल. या कार्यक्रमात पावसाळी कविता, स्थानिक कवींच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण आणि काव्यावर आधारित संगीतमय गायन होणार आहे.
पावसात भिजण्यासोबतच कवितेच्या आणि सुरांच्या ओलाव्यात भिजण्याचा आनंद रसिकांना एकाच ठिकाणी घेता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शब्दयात्रेचा आस्वाद घेण्यासाठी सर्व साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.