सावंतवाडी : माजगाव जमिनीचे नकाशे उपलब्ध करून द्या; अन्यथा २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

शेअर करा

भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जीर्ण नकाशांमुळे खातेदारांचे काम ठप्प, तहसीलदारांचे लक्ष वेधले

सावंतवाडी,दि.२४ जून

माजगाव येथील खातेदारांचे जमिनीबाबतचे नकाशे जीर्ण झाल्याने उपलब्ध होत नसल्याबाबत माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत व खातेदार ग्रामस्थांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असून अधिकारी मोजणीसाठी गेलेले आहेत, अशी खोडसाळ भाषा वापरली जाते. त्यामुळे माजगाव ग्रामस्थांतर्फे गुरुवार २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जन आक्रोश आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला.

येथील शेतकरी बांधव गेली कित्येक वर्षे गावात शेती व अन्य शेतीपूरक व्यवसाय करीत असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान व इतर नैसर्गिक आपत्ती यामुळे आमचे नुकसान होते. शासनाकडून विविध प्रकारची नुकसानी पोटी भरपाई जाहीर केली जाते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गाव तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याकडून प्रस्ताव मागितले जातात. परंतु, जमिनीविषयक अटी व शर्ती घालून प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी नकाशाची मुख्य सामाविष्ट केलेली असते. त्यावेळी शेतकरी भूमिअभिलेख कार्यालय सावंतवाडी यांच्याकडे मागणी करतात. मात्र, हे रेकॉर्ड उपलब्ध होत नाही. नकाशे फाटलेले आहेत अशी वारंवार उत्तरे दिली जातात. यामुळे कार्यालयात शेतकऱ्यांना हेलफाटे मारावे लागतात, शेतकरी कंटाळून नुकसान भरपाई नको या मनस्थित पोहोचतात. प्रस्ताव मंजूरीवेळी नकाशा नसल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितले जाते.

सन २००० पासून शेतकऱ्यांची मागणी असून रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाल्यापासूनची अशी परिस्थिती असून लेखी निवे देऊन सन २००२ रोजी शासनाच्या समाधान योजनेत प्रस्ताव मांडून सुद्धा गेली २४ वर्षे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अद्यापपर्यंत कामात सुधारणा होत नाही. नुकसान भरपाई मिळत नसल्याने ग्रामस्थांत नाराजी असून याला जबाबदार कोण ? याबाबत भुमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात. त्यामुळे माजगाव ग्रामस्थांतर्फे गुरुवारी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा श्री. सावंत यांनी दिला.

शेअर करा