प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सभा; सुमारे ४०० पदाधिकारी राहणार उपस्थित
सावंतवाडी,दि.०८ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विस्तारित कार्यकारिणी सभा उद्या बुधवार दि.९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेला सुमारे ४०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी ही माहिती दिली.
या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्हाभरातील विस्तारित कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच तसेच खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमात दोघांचेही जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी कामांचे कौतुक करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात येणाऱ्या ‘सेवा सप्ताह’ अभियानाचे नियोजन केले जाईल. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून यशस्वी २५ वर्षे जनसेवा पूर्ण केल्याबद्दल हे अभियान राबवले जाणार आहे.
याशिवाय, बूथनिहाय मतदार नोंदणीचा आढावा घेऊन निवडणूक व संघटनेच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन केले जाणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्तास्थाने असून पक्ष अधिक मजबूत होत आहे, असा विश्वासही प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये काही अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. ते भाजपचे सदस्य आहेत. मात्र त्यांनी अपक्ष उमेदवार निवडून विजय मिळवला असल्याने त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता तो उद्याच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत होणार असल्याची चर्चा आहे.