सावंतवाडी,दि.३० ऑगस्ट
१२-० असा एकतर्फी निकाल : तब्बल ६८ वर्षांनी निवडणूक
सावंतवाडी : तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे या संस्थेच्या सन २०२६-२०३१ करिता कार्यकारी मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ‘तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेल’ने दणदणीत विजय मिळविला आहे. या पॅनेलच्या सर्व १२ उमेदवारांनी विजय मिळवत १२-० असा एकतर्फी निकाल नोंदविला.
तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळासाठी तब्बल ६८ वर्षांनी प्रथमच निवडणुक झाली. या निवडणुकीत ‘तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेल’ विरुद्ध ‘तळवडे शिक्षण विकास पॅनेल’ अशी लढत झाली. निवडणूकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या ‘तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेल’ च्या
१२ ही उमेदवारांनी एकतर्फी बाजी मारली. मतदारांनी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पसंती देत विरोधी पॅनेलला एकही जागा मिळू दिली नाही. त्यामुळे तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेलचा हा विजय विशेष लक्षवेधी ठरला आहे.
विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये श्री. उमाकांत काशिनाथ भगत, श्री. विजय कृष्णाजी बुगडे, श्री. विजय बापुजी फेंद्रे, श्री. सुरेश जगन्नाथ गावडे, श्री. बाबुराव दत्ताराम गोडकर, श्री. देवेश शिवराम कावळे, श्री. भालचंद्र अनंत कांडरकर, श्री. भूषण लवू पेडणेकर, श्री. न्हानू विष्णू पेडणेकर, श्री. श्रीकृष्ण शंकर पेडणेकर, श्री. शंकर संभाजी उर्फ बाळू साळगावकर आणि श्री. संतोष विठ्ठल सावंत यांचा समावेश आहे.
या संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय वाटचालीसाठी योग्य नेतृत्व निवडण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. निकालानंतर सर्व १२ उमेदवार विजयी झाल्याने पॅनेलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाकडून संस्थेच्या शैक्षणिक विकासाला अधिक चालना मिळावी, विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेची प्रगती साधावी आणि तळवडे तसेच पंचक्रोशीतील शैक्षणिक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.