सावंतवाडी,दि.१२ सप्टेंबर
सावंतवाडीचे नगरसेवक तौकीर शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल तौकीर शेख यांना शिफारस पत्र प्रदान करणे व त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, उभा बाजार येथील जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान / राजू मसुरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मसुरकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर आणि तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तौकीर शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जाईल आणि त्यांना अधिकृत शिफारस पत्र सुपूर्द केले जाईल.
या सत्कार सोहळ्याला काँग्रेस पक्षातील सर्व नेते, महिला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.