सावंतवाडी,दि.१२ सप्टेंबर
ओवळीये-वरचीवाडी येथे बंद घराच्या छतावरील कौले काढून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये किरण चंद्रकांत महाडिक (वय २७, रा. दिवा, ठाणे), ऋतिक राजेश गोळपकर (वय २६, रा. परेल, मुंबई) आणि हरेश सनी पवार (वय १९, रा. सावंतवाडी) यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. ओवळीये येथील कौस्तुभ विष्णू सावंत हे कुटुंबासह सावंतवाडी शहरात हॉटेल व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी सकाळी सावंत, त्यांची पत्नी आणि आई घर बंद करून सावंतवाडीला आले होते.
दरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास सावंत यांची आई एसटी बसने ओवळीये येथील घरी परतली. घराचा दरवाजा उघडून आत गेल्यानंतर मधल्या खोलीतील लोखंडी कपाट उघडे असल्याचे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक पाहणी केली असता चोरट्यांनी छतावरील कौले काढून घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. कपाटातून ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले.
या प्रकरणी कौस्तुभ सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत संशयितांचा माग काढला आणि तिघांना अटक केली. शुक्रवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.