भटवाडी-काजरकोंड परिसरातील प्रकार; स्थानिकांच्या सतर्कतेनंतर कारवाई, प्राथमिक चौकशीनंतर पुढील कार्यवाही सुरू.
सावंतवाडी,दि.२४ जून
शहरातील भटवाडी काजरकोंड परिसरात मुस्लिम वेशातील मदतीसाठी पैशांची मागणी करणाऱ्या तीन संशयित काश्मिरी नागरिकांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना परत पाठवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, यावरून कार्यकर्त्यांनी अनेक सवाल उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.
भटवाडी काजरकोंड परिसरातील एका घरात मुस्लिम वेश परिधान केलेल्या दोन पुरुष आणि एक युवती अशा तीन व्यक्तींनी प्रवेश केला आणि मदतीसाठी पैशांची मागणी सुरू केली. मात्र, त्यांच्या वागण्याबोलण्याचा संशय आल्याने घरच्यांनी तातडीने स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, हे तिघेही स्थानिक नसल्याचे आणि त्यांची हिंदी भाषाही वेगळी असल्याचे निदर्शनास आले. वाढत्या संशयामुळे कार्यकर्त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांना पाचारण केले.
पोलीस चौकशीत जम्मू-काश्मीरचे कनेक्शन
माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत हे नागरिक जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा गावचे असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी अधिकृत पडताळणीसाठी थेट जम्मू-काश्मीरमधील संबंधित पोलीस ठाणे, तेथील बीट अंमलदार आणि सरपंचांशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर, हे नागरिक फिरस्ते असल्याची नोंद करून त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी अशा संशयित लोकांपासून सावध राहावे, त्यांना घरात घेऊ नये आणि काहीही संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे गंभीर सवाल
पोलिसांनी या नागरिकांची ओळख पटल्याचे सांगितले असले, तरी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. काश्मीरमधून एवढ्या लांब हे लोक सावंतवाडीत का आले? ते कोणाच्या आश्रयाने थांबले होते? त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रे व कागदपत्रे खरी की बनावट? त्यांना येथे नेमके कोणी आणले आणि त्यामागील उद्देश काय? असे अनेक गंभीर सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकाराबाबत आपण वरिष्ठांना सविस्तर माहिती देणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ संशयाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
अक्रोड विकण्याच्या बहाण्याने दाखल
सदरचे काश्मीर मुस्लिम हे गेले काही वर्ष अक्रोड विकण्याच्या बहाण्याने नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात येत असत. मात्र, यावर्षी अक्रोडचे पिक आल्याने आम्ही चंदा गोळा करण्यासाठी फिरत आहोत व त्यातून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी बोलताना तेथील नागरिकांना सांगितले. परंतु असे असले तरी त्यांचे वागणे बोलणे संशयित असल्याने नागरिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.