सावंतवाडी, दि. २४ जून
सावंतवाडी शहरात प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शहरातील नगरपरिषद समोरील मुख्य मार्ग, जयप्रकाश चौक, गांधी चौक, आणि भवानी चौक या भागात तर कायमच वाहतूक कोंडीचा विळखा पाहायला मिळत आहे. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत आर.पी.डी. हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि नगरपरिषद परिसरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात बैठका होऊन सक्षम कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, या केवळ चर्चाच ठरल्या असून प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेसमोर नियमितपणे वाहतूक पोलीस तैनात असतात, तरीही त्यांच्या डोळ्यादेखत आर.पी.डी. हायस्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी शाळा सुटल्यानंतर या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. त्यातच या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो. दोन्ही बाजूंच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे आणि एकाच वेळी शेकडो विद्यार्थी बाहेर पडत असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतही ही कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक होते किंवा काही वेळा याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी ओरड नागरिकांमधून होत आहे. या वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नसून अपघातांची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे केवळ चर्चा न करता, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष मैदानावर उतरून अवैध पार्किंगवर कारवाई करावी आणि शाळा सुटण्याच्या वेळेत या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस पुढाकार घ्यावा, अशी तीव्र मागणी सावंतवाडीकर जनतेतून केली जात आहे.