सावंतवाडी : आकेरीत एस.टी. बससेवा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी

शेअर करा

विद्यार्थी, महिला व प्रवाशांच्या सोयीसाठी निवेदन; मान्यताप्राप्त थांब्यावर बस थांबविण्याची स्थानक प्रमुखांकडे मागणी

सावंतवाडी,दि.२७ ऑगस्ट

आकेरी गावातील वि‌द्यार्थी, महिला व सर्वसामान्य प्रवाशांसाठी एस.टी. बससेवा सुरळीत करण्याबाबत तसेच आकेरी येथे निर्धारित, मान्यताप्राप्त थांब्यावर बस थांबविण्याबाबत तातडीने आवश्यक सूचना देण्याबाबतची मागणी आकेरीतील ग्रामस्थांनी केली. कुडाळ उपसभापती जीजा तेली, सावंतवाडी उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन स्थानक प्रमुखांना देण्यात आलं.

सावंतवाडी बस स्टॅड वरुन आकेरी येथिल मुलांना गाडीत घेणार नाही, व आकेरित बस थांबविणार नाही असे चालकाकडून सांगण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. आज स्थापन प्रमुख गौतमी कुबडे यांची त्यांनी भेट घेतली. आकेरी गावातील वि‌द्यार्थी मोठ्या संख्येने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सावंतवाडी येथे ये-जा करतात. आकेरी गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कामगार व इतर सर्वसामान्य प्रवासी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा व दैनंदिन कामकाजासाठी एस.टी. बससेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, सध्या आकेरी येथे एस.टी. बससेवेबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्या असून, काही बस चालक व वाहक आकेरी येथे प्रवासी घेण्यासाठी बस थांबवत नसल्याच्या तसेच बस थांबूनही प्रवाशांना विशेषतः वि‌द्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी म्हटले.

कुडाळहून सावंतवाडीकडे येणाऱ्या काही बस आकेरीतील प्रवाशांना न घेता थेट सावंतवाडी जाण्याचे सांगितले जाते. आकेरी गावातील ग्रामस्थांना चालक, वाहक अथवा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी संघर्ष निर्माण करायचा नसून नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित व नियमित वाहतूक सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तर विद्यार्थ्यांना बस मध्ये न घेणाऱ्या चालकाची चौकशी करून आकेरी येथील मान्यताप्राप्त निर्धारित बस थांब्याबाबत स्पष्ट सूचना सर्व चालक व वाहकांना द्याव्यात. तसेच बस स्थानकावर पोलीसांची तसेच महिला पोलीसांची व्यवस्था करावी अशी मागणी केली. यावेळी स्थानक प्रमुख गौतमी कुबडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जीजा तेली, राजन भगत, बाळा सावंत, किरण गावडे, आनंद परब, गंगाराम वरक, शंकर परब आदी आकेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा