आजगाव वाघबीळ येथील खोल दरीत कोसळता-कोसळता वाचली प्रवासी बस; ४० प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण
सावंतवाडी,दि.२८ जुलै
शिरोडा मुख्य रस्त्यावरील आजगाव वाघबीळ परिसरात सोमवारी (२७ जुलै) सायंकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांनी भरलेली पणजी वेंगुर्ले कदंबा बस खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. बसमधील सुमारे ४० प्रवाशांचे प्राण दैवबलवत्तर म्हणून बचावल्याने मोठा अनर्थ टळला.
या ठिकाणी वळणदार रस्ता व रस्त्यालगत खोल दरी असून सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. तर ही बॅरिकेट्स गेल्या वर्षी काही प्रमाणात कोसळली असून,या ठिकाणी बांधकाम विभागाने फक्त प्लास्टिक पट्टी (रिबन) लावून आपले हात वर केले.वर्ष उलटूनही या ठिकाणी काहीच उपाय योजना न केल्यामुळे नागरिकांनी , वाहनचकांनी संताप व्यक्त केला.
तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जात आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत.
ग्रामपंचायत तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने देऊन तसेच तोंडी पाठपुरावा करूनही या धोकादायक ठिकाणाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कालच (सोमवार) घडलेल्या बस अपघात घटनेनंतर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, “मोठी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”
त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होत,या मार्गावरील नादुरुस्त बॅरिकेट्स तातडीने बदलून नवीन संरक्षक कठडे उभारावेत, बॅरिकेट्स बदलावेत,वाढलेली झाडी-झुडपे हटवावीत आणि रस्ता सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून, वाहनचालकांकडून होत करण्यात येत आहे.