केंद्रीयमंत्री हरदीप सिंह पुरी यांची खा. नारायण राणे , पालकमंत्री नितेश राणे , आ. निलेश राणे घेतली भेट
सिंधुदुर्ग ,दि.२५ ऑगस्ट
महाराष्ट्रातील यांत्रिक मासेमारी नौका व मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे खा. नारायण राणे नेतृत्वात मच्छीमार शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्या समवेत झालेल्या या भेटीत मच्छीमारांच्या डिझेल दरासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
डिझेलच्या किमतीतील तफावतीमुळे मच्छीमारांच्या मासेमारी फेऱ्यांवर, मासळीच्या आवकेवर तसेच त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना योग्य ती आर्थिक सवलत मिळावी आणि डिझेल किरकोळ दराने उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.

मच्छीमारांना डिझेल दरात सवलत मिळाल्यास त्यांच्या मासेमारी व्यवसायावरील आर्थिक भार कमी होऊन मासेमारी फेऱ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होईल. तसेच मासळीची आवक वाढून मच्छीमारांच्या उत्पन्नाला हातभार लागेल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मच्छीमार समाजाला मोठा दिलासा मिळण्यासोबतच सागरी मत्स्यव्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता आणि शाश्वतता वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संस्था संघाच्या अध्यक्षा ज्योती राजेश मेहेर, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, रत्नागिरी जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष हरेश्र्वर कालेकर, देवगड यांत्रिक नौका मालक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, देवगड फिशर मेन्स सोसायटीचे तज्ञ संचालक सचिन कदम, मुंबई जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संघ, रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील तसेच नगरसेवक व मच्छिमार निवृत्ती तारी उपस्थित होते.मच्छीमारांच्या या महत्त्वपूर्ण मागणीबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक चर्चा झाली आहे.