न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीजचा जिल्हाभरात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; उपजिल्हाधिकारी विजय सहारे यांच्या हस्ते शुभारंभ
सिंधुदुर्ग,दि.२१ जुलै
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीजच्या वतीने ओरोस येथील सियोन गड परिसरात वृक्षारोपण अभियानाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी (जिल्हा पुरवठा विभाग) विजय सहारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
यावर्षी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प संस्थेने केला असून, त्याची सुरुवात सियोन गड परिसरातून करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजय सहारे यांच्यासमवेत त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, ओरोस ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल मालवणकर, माजी पोलीस पाटील भगवान कदम तसेच संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सुमारे १०० वृक्षांच्या कलमांचे वाटप करून नागरिकांना वृक्षसंवर्धनासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजय सहारे आणि जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
संस्थेच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.