सावंतवाडीतील मंगळवार बाजारात दारू पिऊन अश्लील भाषा वापरणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांवर कारवाई करा

शेअर करा

ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे सावंतवाडी नगराध्यक्षांना निवेदन

​सावंतवाडी,दि.२८ ऑगस्ट
सावंतवाडी शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात काही परप्रांतीय भाजी विक्रेते मद्यपान करून भाजी विक्री करत असून, खरेदीसाठी येणाऱ्या महिला ग्राहकांसमोर अश्लील व अर्वाच्य भाषेचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा बेजबाबदार आणि उपद्रवी परप्रांतीय भाजी विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटना, सावंतवाडी’च्या वतीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


​नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारच्या आठवडा बाजारात काही परप्रांतीय विक्रेते दारू पिऊन येऊन भाजी विक्री करतात. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना शुद्ध नसते आणि भाजी खरेदीसाठी आलेल्या स्त्रियांसमोर ते मोठ्या आवाजात अश्लील भाषेत ओरडतात. या विक्रेत्यांना अनेकदा समज देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही.


​गेल्या मंगळवारी आठवडा बाजारात बांदेकर मेसजवळ बसलेल्या एका भाजी विक्रेत्याला अश्लील भाषेत बोलू नको, असे संगितले असता त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी ट्रॅफिक पोलिसांना पाचारण करण्यात आले होते; मात्र तरीही सदर भाजी विक्रेत्याची भाषा अत्यंत उद्धट आणि अरेरावीची होती. या प्रकारामुळे बाजारात येणारे ग्राहक त्रस्त झाले आहेत.


​अशा प्रकारे दारू पिऊन भाजी विक्री करणाऱ्या आणि महिलांसमोर अश्लील भाषा वापरणाऱ्या परप्रांतीय भाजी विक्रेत्यांचा नगरपरिषद व प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष धर्मेंद्र सावंत यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी (सावंतवाडी नगरपरिषद) आणि पोलीस निरीक्षक (सावंतवाडी पोलीस ठाणे) यांनाही माहिती व आवश्यक कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.

शेअर करा