तळेरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शेअर करा

एनसीसी कॅडेट्सचा सहभाग; प्रभातफेरीत देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमली बाजारपेठ

तळेरे,दि.१५ ऑगस्ट

तळेरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साह, आनंद आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. तळेरे ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच संदीप घाडी यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शाळा तळेरे क्रमांक १ येथे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते, तर वामनराव महाडिक विद्यालयात माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण समारंभास जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध थोर महापुरुषांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काही विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीर व महापुरुषांच्या कार्यावर भाषणे केली. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळा तळेरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांची संगीत कवायत घेण्यात आली. देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संगीत कवायतीने उपस्थितांची दाद मिळवली.

वामनराव महाडिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेतून प्रभातफेरी काढली. विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनीही शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी तळेरे बाजारपेठ दुमदुमून गेली. वामनराव महाडिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या लॉंग मार्चने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तसेच वामनराव महाडिक विद्यालयाच्या मैदानावर विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला.

या उत्साहपूर्ण वातावरणात माजी सभापती तथा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. तसेच तळेरे बसस्थानकातील कर्मचारी, प्रवासी व वाहनधारकांनाही जिलेबीचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेरे परिसरात दिवसभर देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

शेअर करा