तळेरे तालुका निर्मितीसाठी २९ ऑगस्टला निर्धार मेळावा

शेअर करा

दशक्रोशीतील सर्व गावांची एकजूट दाखविण्यासाठी तळेरे येथे आयोजन; तालुका निर्मितीच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

तळेरे दशक्रोशीतील गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

तळेरे,दि.२८ ऑगस्ट

नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने तळेरे तालुक्याचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरावे या आग्रही मागणीसाठी दशक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांची एकजूट करून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या नियोजित तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता तळेरे-वैभववाडी मार्गावरील कासार्डे - आनंदनगर येथील स्मित लाॅन्स सभागृहात दशक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांच्या एकजूटीची वज्रमूठ तयार व्हावी यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून तळेरे तालुक्याची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी त्याबाबतचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासन या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नसून त्यासाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने दशक्रोशीतील गावांमधील सर्व आजी माजी जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सर्व गावांचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांचा एकत्रितपणे २९ ऑगस्ट रोजी निर्धार मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संकल्प मेळाव्यात सर्वंकश विचारविनिमय करून सर्व गावातील जनतेची एकजूट दाखवून देण्यासाठी निर्धार करण्यात येणार आहे. 

  नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या माध्यमातून ही चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी इतर सर्व गावांना सहभागी करून घेऊन त्यामध्ये त्यांचा सहभाग वाढविण्या चे ठरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे आजूबाजूच्या दशक्रोशीतील संभाव्य गावांमधील ग्रामस्थांमधून प्रतिनिधींची निवड करुन नियोजित नवीन तळेरे तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.
     नियोजित तळेरे तालुक्यांमध्ये तळेरेसह, कासार्डे, ओझरम, दारुम, नांदगाव, तोंडवली, बावशी, पियाळी, वाघेरी, आयनल, असलदे, कोळोशी, हडपीड, शिरवली, ओंबळ, नाद, गवाणे, वेळगिवे, वाघिवरे, बुरंबावडे, विठ्ठलादेवी, फणसगाव, उंडील, कुणकवण, कोर्ले, धालवली, मणचे, मटाट, पाळेकरवाडी, पोंभुर्ले, पाटगाव, महाळुंगे, पेंढरी, सोमलेवाडी, मालपे, बापार्डे, तिर्लोट, सौंदळ, वाघोटण, साळीस्ते, शिडवणे, वारगाव, नडगिवे, शेर्पे, कुरंगवणे, चिंचवली, वायंगणी, खारेपाटण आदी गावांचा संभाव्य तळेरे तालुका निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

    मुंबई गोवा आणि विजयदुर्ग -कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व सोयी सुविधांनी युक्त व मध्यवर्ती ठिकाण म्हणून तळेरे गावाची वेगळी ओळख आहे. ब्रिटिशकालीन व ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आजुबाजुच्या दशक्रोशीतील कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग पट्टयातील किमान ४५ ते ५० गावातील जनतेला मध्यवर्ती बाजारपेठचे ठिकाण म्हणून तळेरे हे ठिकाण सर्वदृष्ट्या सोईस्कर ठरते.
    शासनाने नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या काही नवीन तालुक्यांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र या यादीत तळेरे तालुका निर्मिती समावेश नव्हता. या नंतर जाहीर करण्यात येणाऱ्या यादीमध्ये तळेरे गावाचा नक्कीच समावेश करण्यात येईल आणि त्याची निश्चितच घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे लवकरच करतील हा विश्वास तळेरेवासीयांना आहे. 
     तळेरे तालुका निर्मितीची ज्योत अखंडपणे प्रज्वलीत होत रहावी यादृष्टीने नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीने पुढील पाऊल टाकत दशक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांची एकजूट करून ही वज्रमूठ अधिक भक्कम व्हावी यासाठी सावध पवित्रा घेत   तळेरे तालुका निर्मितीसाठी आश्वासक पाऊल टाकले आहे. या मेळाव्यात पुढिल निश्चित दिशा ठरवली जाणार आहे.
      तरी या मेळाव्याला तळेरे गावातील सर्व सामाजिक संस्था, व्यावसायिक, व्यापारी संघटना, विविध मंडळांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, रिक्षा, टेंपो, मॅजिक संघटना, महिला बचतगट, युवक, युवती, ग्रामस्थ तसेच तळेरे दशक्रोशीतील सर्व आजी माजी जि.प., पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ राजू जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर आणि माजी पं.स.सभापती तथा भाजपा कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले आहे.

शेअर करा