तळेरे:‘मधुसूर’ राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या पल्लवी पिळणकर प्रथम

शेअर करा

तळेरे,दि.२६ ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील कु. पल्लवी वीणा संजय पिळणकर हिने सातारा येथे स्वर्गीय नानासाहेब द्रविड यांच्या स्मरणार्थ ॲड.अमित द्रविड यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मधुरसूर’ राज्यस्तरीय संगीत स्पर्धेच्या पाचव्या वर्षात शास्त्रीय संगीत खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. राज्यभरातून तब्बल १०६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शास्त्रीय संगीताच्या खुल्या गटात पल्लवीने आपल्या सुमधुर व प्रभावी गायनाने प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा की चुरशीची होती की परीक्षकांना देखील परीक्षण करणे अवघड झाले होते.

स्पर्धेसाठी डॉ. अनघा धायगुडे, डॉ. शीतल धर्माधिकारी, रवींद्र क्षीरसागर आणि अरविंद काडगावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पल्लवीने शास्त्रीय संगीताचे पायाभूत शिक्षण सावंतवाडी येथील सौ.ईश्वरी तेजम यांच्याकडून घेतले. सध्या ती पुणे येथील पंडित डॉ.समीर दुबळे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे पुढील शिक्षण घेत आहे.

आपल्या यशाबद्दल पल्लवी म्हणाली, “या यशामागे माझ्या दोन्ही गुरुजनांची मेहनत, आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि श्री.दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे.” आपल्या यशाचे श्रेय तिने गुरुजन, आई-वडील आणि श्री. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाला दिले.

पल्लवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीतप्रेमी, गुरुजन, कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

शेअर करा