तळेरे: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन

शेअर करा

२९ ऑगस्टला जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा: ३० ऑगस्टला ‘Sundays on Cycle’ सायकल रॅली

तळेरे,दि.२६ ऑगस्ट

  महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ ही संकल्पना असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित उपक्रम २८ ते ३० ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मान्यताप्राप्त क्रीडा संघटना, फेडरेशन, क्रीडा अकॅडमी, ज्येष्ठ नागरिक संघ, युवक मंडळे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा पिढीला तंदुरुस्त बनविणे तसेच ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.
२८ ऑगस्ट रोजी ‘Digital Tributes’, ‘२९ Challenge’, ‘Pass the Ball’ आणि ‘Sports Bandhan’, तर २९ ऑगस्ट रोजी ‘एक घंटा खेल के मैदान में’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. या स्पर्धेत ५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारांत ८, १०, १२, १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत.

३० ऑगस्टला ‘Sundays on Cycle’
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि सायकलिस्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी ‘Sundays on Cycle’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.१५ वाजता एकत्र येण्याची वेळ, तर ५.३० वाजता रॅलीला सुरुवात होईल. सुमारे २० ते २५ किलोमीटरच्या नयनरम्य मार्गावर ही सायकल राईड होणार आहे.

रॅलीला इन्स्पायर सायकल्स, कुडाळ येथून सुरुवात होऊन एस. एन. देसाई चौक, पिंगुळी तिठा, पाट रोडमार्गे पाट तलाव येथे पोहोचण्यात येईल. पाट तलाव येथे एकत्र येऊन फोटो ब्रेकनंतर यू-टर्न घेऊन पाट रोडमार्गे पुन्हा इन्स्पायर सायकल्स येथे राईडची सांगता होईल.
सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी हेल्मेट तसेच पुढील व मागील लाईट्स असणे बंधनकारक राहणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या या विविध उपक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

शेअर करा