तळेरे,दि.३० ऑगस्ट
कोकणच्या समृद्ध दशावतार लोककलेचा प्रचार-प्रसार आणि जतन करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे सुप्रसिद्ध दशावतारी स्त्री भूमिका कलाकार यश जळवी यांचा जनजागृती सेवा संस्था, बदलापूर (रजि.) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यश जळवी यांनी पदवीधर असूनही दशावतार कलेच्या संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. स्त्री भूमिका साकारत त्यांनी दशावतार रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था (रजि.)चे संस्थापक सहदेव धर्णे, जिव्हाळा सेवाश्रम, कुडाळचे संस्थापक सुरेश बिर्जे, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक गुरुनाथ तिरपणकर तसेच शिक्षक व नाटककार संतोष सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर सहदेव धर्णे, सुरेश बिर्जे आणि संतोष सांगळे यांचाही जनजागृती सेवा संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी यश जळवी यांच्या आजी सुरेखा जळवी व आई भारती जळवी उपस्थित होत्या. निवासस्थानी येऊन झालेल्या या सत्कारामुळे जळवी कुटुंबीय भावूक झाले.
संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती सेवा संस्था विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे निःस्वार्थीपणे कार्यरत आहे. आकर्षक मानपत्र निर्मितीसाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे तसेच संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. यावेळी अक्षरोत्सव परिवाराचे प्रमुख निकेत पावसकर उपस्थित होते.