अपघात झाल्यावर महामार्ग प्राधिकरणाला जाग येणार का?
तळेरे,दि.२३ जुलै
मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रोड वरुन वैभववाडी- कोल्हापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अरूंद वळणावर रस्त्याखालून गेलेल्या गटारावरती एक महिन्यापूर्वी पासून भलेमोठे भगदाड पडलेले आहे. त्यामुळे ते पडलेले भगदाड अपघातास कारणीभूत ठरणारे आणि एखाद्याच्या जीवावर बेतणारे ठरणार आहे. त्याठिकाणी अपघात घडल्यास महामार्ग प्राधिकरण सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा तळेरे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण अर्जुन वरुणकर यांनी वीस दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री.कुमावत यांचे सातत्याने लक्ष वेधून देखील त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य दिसत नाही. तातडीने दोन दिवसात दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊन देखील अद्यापही अपघातास कारणीभूत ठरणारे सदरचे भगदाड अद्यापही जैसे थे स्थितीत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या या बेजबाबदारपणामुळे तळेरेवासीयांनी तीव्र संताप व्यक्त करुन अचानक रास्ता रोको आंदोलन करुन महामार्ग रोखण्याचा अखेरचा निर्वाणीचा इशारा समस्त तळेरेवासीयांनी दिला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रोड वरुन वैभववाडी- कोल्हापूर रस्त्यावरील अरुंद आणि धोकादायक वळणावरती सर्व्हीस रस्त्याखालून गेलेल्या गटारावरती भलेमोठे भगदाड पडले आहे. पुणे, कोल्हापूर वैभववाडी मार्गे मुंबई गोवा महामार्गावर येणाऱ्या वाहनांची फार मोठी वर्दळ दिवस रात्र सुरू असते. तळेरे येथून वैभववाडी मार्गे कोल्हापूर हा महामार्ग देखील तळेरे पर्यंत मुंबई गोवा महामार्गाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवासी आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर सतत वाहतूक सुरू असते. कोल्हापूर मार्गे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाण्यासाठी करुळ-गगनबावडा मार्गे जाणारी बहुतांश वाहने याच महामार्गाने जात येत असतात. परंतु हे दोन्ही महामार्ग तळेरे येथे ज्या ठिकाणी एकत्रितपणे येतात त्याच ठिकाणी अरुंद सर्व्हिस रस्त्यामुळे मोठी अवजड वाहने वळवितांना वाहनचालकांना देखील फार मोठी कसरत करावी लागते. त्याचबरोबर अरुंद सर्व्हिस रस्त्यामुळे तळेरे येथील बंदिस्त उड्डाणपूलामुळे फार मोठी समस्या निर्माण होऊन दोन्ही बाजूला वाहनांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
हे दोन्ही महामार्ग तळेरे येथे ज्याठिकाणी जोडले जातात तेथेच रस्त्याखालून बांधण्यात आलेल्या गटाला वरती सुरूवातीला लहानसा पडलेला खड्डा सततच्या अवजड वाहनांमुळे दिवसेंदिवस अधिक मोठा होत जाऊन त्याचे रुपांतर आता मोठ्या भगदाडात झाले आहे. त्यावरती दगड टाकून ठेवण्यात आले होते. परंतु टाकलेले दगड सततच्या अवजड वाहनांनी खाली दबले गेले असून ते कधीही आतमध्ये कोसळू शकतात अशी सध्याची स्थिती आहेत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी रस्त्यावरुनच वाहत असल्याने सदरचा खड्डा वाहत्या पाण्यामुळे वाहनचालकांना दिसण्यात येत नसल्याने त्या खड्डयात येणाऱा जाणाऱा मोटरसायकल स्वार किंवा येणारी जाणारी वाहने त्या भगदाडात अडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच तेथील वळणावरील रस्त्या देखील खचला आहे. त्यामुळे ते अरुंद वळण धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरणारे बनले आहे.
याबाबत आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबतच्या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या महामार्ग प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात त्यावरती सिमेंटचा ब्लॉक टाकून ठेवण्यात आला आहे. मात्र त्या वळण रस्त्यावरुन जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या वाहनचालकांना फार मोठी कसरत करत त्यावरुन वाहने हाकावी लागत आहेत. दोन दिवसात अरुंद वळण रस्त्यावरील पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाचे खारेपाटण विभागाचे अभियंता श्री. कुमावत यांनी देऊन रास्ता रोको आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नाही त्या गोष्टीला वीस दिवसांचा कालावधी लोटला तरी पडलेले भगदाड जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे तळेरेवासीयांनी यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. निर्ढावलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आणण्यासाठी शेवटी कोणत्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा तळेरेवासीयांनी दिला आहे.