देवगड अणुऊर्जा प्रकल्पावरील ठरावावर नगरपरिषदेत गदारोळ

शेअर करा

विषयपत्रिकेवर आक्षेप; अॅड. प्रणाली माने व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक, ठराव अखेर पटलावरून रद्द

देवगड,दि.२७ ऑगस्ट
देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पास देवगड जामसंडे नगर पंचायतीचा अधिकृत विरोध दर्शविण्याबाबतचा ठराव मंजूर करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे, हा विषय न. पं. प्रशासनाकडून गुरुवारी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्यात आल्याने नगरसेविका अॅड. प्रणाली माने यांच्यासह गटनेते शरद ठुकरूल यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. न. पं. प्रशासनाकडे सदर प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती राज्य शासनाकडून आलेली नसताना हा विषय का पटलावर घेण्यात आला? असा सवाल अॅड. माने यांनी उपस्थित करीत नगराध्यक्षांसह प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या विषयावर प – शासनाच्यावतीने बाजू मांडताना मुख्याधिकारी गौरी पाटील व नगरसेविका अॅड. माने यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली. अखेर, याबाबत कोणताही ठराव न घेता हा विषय पटलावरून रद्द करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सभेत घनकचरा व्यवस्थापन, मोकाट गुरांचा विषयदेखील गाजला.
देवगड- जामसंडे नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष मिताली सावंत, न. पं. पाणी पुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी उपस्थित होते. देवगडातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला अधिकृत विरोध दर्शविण्याबाबतचा ठराव नगर पंचायतीने मंजूर करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणे या विषय सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्यात आल्याने अॅड. माने व गटनेते शरद ठुकरुल यांनी आक्षेप घेतला. सदर प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून कोणती माहिती प्राप्त झाली आहे का? असेल तर ती माहिती आधी सभागृहासमोर प्रशासनाने ठेवावी, असे शरद ठुकरूल यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी असा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये प्रस्तावित नसल्याचे सांगितले आहे. तरीही हा विषय सभेच्या पटलावर का ठेवण्यात आला, असा सवाल अॅड. माने यांनी उपस्थित केला. यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू म्हणाल्या, दोन नगरसेवकांकडून प्रस्तावित अणुऊर्जा प -कल्पाबाबत न. पं. ने विरोधाचा ठराव घेण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घ्यावा, असे निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे हा विषय सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्याचे सांगितले. तर स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी, राज्य शासनाचा अणुऊर्जा प – कल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे सांगत हा प्रकल्प देवगडमध्ये प्रस्तावित असल्याचे करारात नमूद केले आहे. त्यामुळे सदर प – स्तावित प्रकल्पास न. पं. ने विरोधाचा ठराव घेण्यासाठी आपण न. पं. प्रशासनाकडे निवेदन दिल्याचे सांगितले. तर प्रशासनाकडून बाजू मांडताना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी, विषयपत्रिकेवर कोणते विषय ठेवावेत हा सर्वस्वी नगराध्यक्षांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी गौरी पाटील व अॅड. माने यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली. या विषयावरील चर्चेत सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेवक नितीन बांदेकर यांनीही सहभाग घेतला. अखेर, न. पं. प्रशासनाने सदर विषय पटलावरून रद्द करीत असल्याचे सांगितले.
नगर पंचायत हद्दीतच घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरुपी जागेची निवड करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला. सध्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत करण्यात येणाऱ्या कचरा डंपिगच्या जागेवरून तेथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या गेल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच कोंडवाड्यात ठेवलेल्या व लिलाव न झालेली गुरे गोशाळेला देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लिलावानंतर गुरांची वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घेण्यात याव्यात, असे ठरविण्यात आले.
नगर पंचायतीच्या स्थापनेपासून पाणी पुरवठा विभागाकडील करण्यात आलेल्या कामांचा संबंधित ठेकेदाराकडून आढावा घेऊन त्याच्या कामाचे पूर्नमूल्यांकन करून त्याचे देय बिल अदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. देवगड- जामसंडे महामार्गालगत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारालगत असलेल्या वाय जंक्शनच्या सुधारणा कामासाठी ना हरकत देण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. तसेच पंतप्रधान आत्मनिर्भर निधी अंतर्गत स्वनिधी से समृद्धी उपक्रम राबविताना लाभार्थी पथविक्रेत्यांचा योग्य सर्व्हे करण्यात यावा, अशी सूचना नगरसेवक नितीन बांदेकर यांनी मांडली. यावेळी विविध विषयांवरील चर्चेत नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले यांनी सहभाग घेतला.

शेअर करा