वेंगुर्ला,दि.३१ ऑगस्ट (प्रथमेश गुरव)
वेंगुर्ला येथील विश्व डान्स अकॅडमीच्या मुलांनी भरतनाट्यमच्या विविध प्रकारात नृत्य सादर करीत गुरूवर्य तुळशीदास आर्लेकर यांना नृत्यातून गुरूवंदना दिली. हा कार्यक्रम ३० ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथील क्लासमध्ये घेण्यात संपन्न झाला.
गुरूवंदना कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक गौरी मराठे, मयुरी केरकर, शिवप्रेमी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष नितीश कुडतरकर, पत्रकार प्रथमेश गुरव यांच्या हस्ते झाले. नृत्याच्या प्रारंभी तुळशीदास आर्लेकर यांची शिष्या कु.निरजा माडकर आणि इतर मुलांनी गुरूचे महत्त्व विशद करणारे नृत्य सादर केले. त्यानंतर अकॅडमीच्या सर्व मुलांनी भरतनाट्यमचे विविध नृत्य प्रकार सादर करीत उपस्थितांकडून वाहवा मिळविली. या कार्यक्रमाला मयुरी माडकर, सुनिता सादजी, वॉल्टर डिसोजा, चंद्रकांत गिरप, प्रसाद शिंदे, किरण ताम्हणकर, विश्व डान्स अकॅडमीच्या संचालिका शितल आर्लेकर आदी उपस्थित होते. नृत्य दिग्दर्शक तथा अकॅडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा तसेच क्लाससाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या वैदेही आरोलकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन ममता खानोलकर यांनी केले. तर आभार वैदेही आरोलकर यांनी मानले.