वेंगुर्ला : एस.एस.पी.एम.हॉस्पिटलची वेंगुर्ल्यात मोफत बाह्यरूग्ण तपासणी

शेअर करा

वेंगुर्ला ,दि.१ सप्टेंबर (प्रथमेश गुरव)

आरोग्याबाबत वेंगुर्ल्यातील नागरिकांनी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एस.एस.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्यातर्फे वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात मोफत बाह्ररूग्ण विभाग सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आठवड्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या सेवेच्या पहिल्याच दिवशी सोमवार दि.३१ ऑगस्ट रोजी डॉ. संजीव आकेरकर हे रूग्णांच्या सेवेसाठी उपस्थित होते. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य आपा फणसेकर, संकेत धुरी तसेच भाजपा युवा मोर्चाचे तुषार साळगावकर यांच्यासह वेंगुर्ला रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या मोफत ओपीडीमध्ये सोमवार ते शनिवार विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये मेडिसिन, न्यूरो फिजिशियन, नेफ्रॉलॉजी, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, अस्थिरोग, जनरल सर्जरी, नेत्ररोग, कान-नाक-घसा, बालरोग व दंतचिकित्सा आदी विभागांचा समावेश आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा उपलब्ध राहणार असून रूग्णांना पूर्णपणे मोफत तपासणीचा लाभ मिळणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचा गरजू रूग्णांना मोठा फायदा होणार आहे.

शेअर करा