वेंगुर्ला,दि.३० ऑगस्ट (प्रथमेश गुरव)
माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत “उत्सव रानभाज्यांचा 2026” अंतर्गत रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले आहे. ही स्पर्धा रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून भटवाडी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात होणार आहे.
स्पर्धेतील पाककृतीमध्ये फक्त रानभाज्यांचाच वापर करणे अनिवार्य आहे. यात फोडशी, तांदूळजा, घोळ, भारंगी, कुरडू, फागला, पेवा, टाकळा, कुडा, केना, पुनर्नवा, सोनारवेल, आडाळा, भुईआवळा, आघाडा, घोटवेल आदी रानभाज्यांचा उपयोग करता येईल.
स्पर्धेच्या नियमांनुसार तयार करण्यात येणारी पाककृती आरोग्यास हानिकारक ठरणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित स्पर्धकाची राहणार आहे. प्रवेशिका पूर्णपणे भरल्याशिवाय प्रवेश ग्राह्र धरला जाणार नाही. पूर्ण भरलेली प्रवेशिका स्पर्धेच्यावेळी आयोजकांकडे जमा करणे आवश्यक असून, तयार केलेल्या पाककृतीची संपूर्ण कृती प्रवेशिकेत सुवाच्च अक्षरात लिहिणे बंधनकारक आहे.
स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून उर्वरित सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच भव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ज्योती देसाई (9420258777), राजन गावडे (9423301310), यासिर मकानदार (7083222422) किंवा खेमराज कुबल (8421699797) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशिका राजश्री कोल्ड्रींक्स, वेंगुर्ला येथे उपलब्ध आहे.
रानभाज्यांची चव, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आरोग्यदायी आहाराचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.