हरकणी शहर स्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
वेंगुर्ला,दि.३० ऑगस्ट (प्रथमेश गुरव)
महिलांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा. नगरपरिषदेला स्वच्छतेची जी ३५ कोटीपर्यंतची बक्षिसे मिळाली त्यामध्ये महिलांचेही योगदान आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
वेंगुर्ला नगरपरिषद असलेल्या हिरकणी शहर स्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रमुख पाहुणे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.राजेश्वर उबाळे, हिरकणी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा आकांक्षा परब यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ.राजेश्वर उबाळे यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. हिरकणी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा आकांक्षा परब यांनी एक महिला ते संघाच्या अध्यक्षापर्यंतचा प्रवास स्पष्ट केला. नगरपरिषद आणि महिला यामधील मी एक दुवा आहे. नगरपरिषदेमध्ये येणाऱ्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहचविल्या जातील. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.परब यांनी दिले. तसेच आत्तापर्यंत मिळालेल्या सहकार्याबद्दल कार्यकारिणीचे आभार मानले.
यानंतर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ घेण्यात आले. यातील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. बचत गटाच्या महिलांनी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या सभेला १२५ गटाच्या सुमारे ३०० महिला उपस्थित होत्या.