आचरा : आढावा बैठकीत आचरा सरपंचानी वीज वितरण समस्यांचा वाचला पाढा

शेअर करा

आचरा,दि.१ सप्टेंबर

आचरा गावात वीज समस्या वाढली आहे. गावातील कोणत्या ना कोणत्या वाडीत रोज काही ना काही वीज समस्या निर्माण होत आहे. लाईनवरची झाडी सफाई म्हणावी तशी झालेली नाही वाडीवाडीवरील लाईनवरची झाडी तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे पुर्वी नव्हती एवढी वीजेची समस्या वाढली आहे. लोकांचा उद्रेक होण्याची वाट बघू नका. समस्यांचे तातडीने निवारण करा अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा असा इशारा आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित नियोजन बैठकीत सरपंच फर्नांडीस यांनी वीज वितरण, बांधकाम विभागाबाबत असणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला.

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळ, आरोग्य विभाग,एसटी महामंडळ बांधकाम विभाग,बंदर विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, महेश राणे, देवस्थान समितीचे संजय मिराशी, कपिल गुरव, पत्रकार परेश सावंत, व्यापारी संघटनेचे अर्जुन बापर्डेकर जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, दिनेश कांबळी, विनायक सावंत, सदाशिव मयेकर, आनंद राणे, दिनेश साळकर, संजय आचरेकर, रोहित मिराशी, चंद्रशेखर तोंडवळकर, बिष्णु भाटकर, एकनाथ पाटील, प्रशांत गावकर, दिपक घाडी, वीज वितरण अधिकारी उपस्थित होते. आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सभेत वीजवितरणवर नाराजी
वीज वितरणचे कार्यालय आचऱ्यात असूनही अधिकारी सभेस उशीराने दाखल झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी सध्या सुरू असलेला वीज समस्ये बाबत सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी रोष व्यक्त केला. आचरा गावात वीज समस्या तीव्र आहे असे असताना वीज वितरण वसुलीच्या मागे लागले आहे आजपासून गणेश उत्सव होईपर्यंत कोणतीही वसुली करू नये तसेच कोणाचेही वीज कनेक्शन कट करू नये असे सांगत वसुलीचा तगादा लावल्यास कनेक्शन कट केल्यास होण्याऱ्या परिणामास वीज वितरण जबाबदार राहणार असल्याचा इशारा सरपंच यांनी दिला. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत खडे बोल सुनावले. याबैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी आठवडा बाजारा दिवशी वाहतूकीच्या नियोजनासाठी रिक्षा संघटना, लागझरी चालक मालक , एस टी वाहतूक नियंत्रण क कक्ष अधिकारी यांना सूचना करत नियोजन करण्यात आले.

शेअर करा