डीपीआर सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्थळ पाहणी; प्रशासकीय मंजुरीसाठी सकारात्मक अहवालाची तयारी
१२ किलोमीटर पंपिंग लाईन, २४ किलोमीटर जलवाहिनी; सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पातून देवगड-जामसंडेला पाणीपुरवठा
देवगड,दि.१ सप्टेंबर
देवगड-जामसंडे नगरपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कोर्ले-सातंडी धरणावरील प्रस्तावित १४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची महाराष्ट्र पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांनी आज स्थळ पाहणी केली. या पाहणीमुळे योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता असून, शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी दिली.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे ३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे या योजनेचा डीपीआर सादर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांनी कोर्ले-सातंडी धरणाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी योजनेतील विविध घटकांची माहिती घेतली तसेच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसंदर्भात अधिकाऱ्यांना आणि सल्लागार कंपनीला महत्त्वाच्या सूचना केल्या.
भामरे यांनी उद्भव विहीर, सौरऊर्जा प्रकल्प, पंपिंग व्यवस्था, पाइपलाइन आणि पाण्याच्या टाकीच्या नियोजित ठिकाणाची पाहणी केली. प्रकल्पाची तांत्रिक बाजू आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबतही त्यांनी सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी, नं. प. मुख्याधिकारी देवदत्त माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगर अभियंता विवेक खोत, न. पं. पाणी पुरवठा विभाग प्रमुख चारुदत्त पारकर तसेच या प्रकल्पासाठी सल्लागार असलेल्या एक्वा कॉन कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनियर अमोल शेळके आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
या योजनेच्या मंजुरीसाठी काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मंत्रालय स्तरावर महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. देवगड-जामसंडे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ही योजना तातडीने मंजूर करून मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि सल्लागार कंपनीने योजनेचे प्राथमिक काम वेगाने पूर्ण केले आहे.
या प्रकल्पांतर्गत धरणातून पाणी उचलून सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या पंपिंग लाईनद्वारे टाकीपर्यंत पाणी आणण्यात येणार आहे. यासाठी २५० हॉर्सपॉवर क्षमतेचे दोन पंप कार्यरत राहणार असून, एक २५० हॉर्सपॉवरचा पंप स्टँडबाय ठेवण्यात येणार आहे. पुढे सुमारे २४ किलोमीटर पाइपलाइनद्वारे देवगड-जामसंडे शहरात पाणी आणण्यात येईल. टाकीनंतरचा पुढील पाणीप्रवास गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर म्हणजेच ग्रॅव्हिटीने होणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक विद्युतपुरवठा सौरऊर्जेच्या माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील वीजखर्च कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात पाणी उपलब्ध करून देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न राहणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती ततन्वी चांदोसकर यांनी सांगितले.
“ही योजना तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असून, पुढील कालावधीत तिला मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे. देवगड-जामसंडे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या योजनेचा पाठपुरावा सुरूच राहील,” असेही तन्वी चांदोसकर यांनी सांगितले.