कणकवली : कोळोशी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड

शेअर करा

कणकवली,दि.१ सप्टेंबर

कोळोशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत चंद्रकांत अर्जुन शिंदे यांची कोळोशी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. यापूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामसभेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.

गावातील विविध सामाजिक प्रश्न, कौटुंबिक व स्थानिक पातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे तसेच गावात सलोखा व शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तंटामुक्त गाव समिती महत्त्वाची भूमिका बजावते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत शिंदे यांच्या मागील कार्यकाळातील कामगिरीवर समाधान व्यक्त करून त्यांची फेरनिवड करण्यात आली.

फेरनिवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कोळोशीचे सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे, सुचिता पोकळे, सानिया इंदप, अनुजा आचरेकर, माजी सरपंच रितिका सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम, विकास सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, सुभाष इंदप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत शिंदे यांच्या फेरनिवडीमुळे गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावी कामकाज होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

शेअर करा