आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्गातील प्रश्नांवर चर्चा
सावंतवाडी,दि.१ सप्टेंबर
सावंतवाडी मतदार संघातील परिवहन महामंडळाच्या विविध समस्यांबाबत आज मंत्रालय येथे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील एसटी मंडळ महामंडळाच्या विविध समस्यांबाबत चर्चा झाली.
सावंतवाडी एस टी स्थानका संदर्भात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीमध्ये त्यात काही आवश्यक बदल करणे बाबत सूचना देण्यात आल्या व पुढील चार दिवसात आराखडाचे पुन्हा सादरीकरण करण्याचे निर्देश मंत्री महोदयांकडून देण्यात आले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या ३० बसेस पैकी पाच बसेस सावंतवाडी आगाराला प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित सर्व बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देणे बाबत आमदार श्री. दीपक केसरकर यांनी आग्रही मागणी केली. यावर परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी १५ बसेस गणेशोत्सवपूर्वी देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यातील पाच बसेस सावंतवाडी,पाच बसेस दोडामार्ग व पाच बसेस वेंगुर्ला तालुक्याला गणेशोत्सव पूर्वी उपलब्ध होणार आहेत.
सावंतवाडी मतदारसंघातील अनेक गावे दुर्गम व डोंगराळ आहेत तसेच काही गावांमध्ये रस्ते अरुंद आहेत. तसेच गावातील अंतिम ठिकाणी बस वळवण्यासाठी अपुरी जागा असते त्यामुळे काही ठिकाणी बस वळवायला अडचण येत आहे. तसेच कमी भारमानामुळे काही बसेस बंद करण्यात आलेले आहेत. मिनी बस उपलब्ध झाल्यास या समस्येवर मार्ग निघणार आहे. तसेच भारमान सुद्धा वाढणार आहे. यासाठी लवकरात लवकर मतदारसंघातील तिन्ही डेपोंसाठी मिनीबस उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार श्री. केसरकर यांनी केली. सदरची मागणी तत्त्वतः मंजूर करून लवकरात लवकर मिनी बस उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.
वेंगुर्ले आगारातील सीएनजी बसना सीएनजी भरण्यासाठी सुमारे चार किलोमीटर लांब खाजगी सीएनजी पंपावर जावे लागते. ट्राफिक जाम मुळे सदरच्या बसना सीएनजी भरून येण्यास बराच वेळ जातो. तसेच जाणे व येणे यासाठी आठ किलोमीटर गाड्या चालतात.यामध्ये श्रम, इंधन व वेळेचा अपव्यय होतो . वेंगुर्ले एसटी बस डेपो मध्ये सीएनजी युनिट मंजूर आहे. मात्र ते अद्याप सुरू झालेले नाही.एम एन जी एल मार्फत मंजूर असलेले सीएनजी युनिट लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार श्री. दीपक केसरकर यांनी केली. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर सी एन जी युनिट चे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले.
आमदार श्री. दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले ते बोरिवली बंद असलेली एसटी बस फेरी पूर्ववत सुरू करणे बाबत आग्रही मागणी केली. याबाबत तात्काळ उचित कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आरटीओ कडे प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत. त्यामुळे एसटी सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. मुळात एसटी महामंडळाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. आरटीओकडे कार्यरत असलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी महामंडळाकडे पाठविणे बाबत आग्रही मागणी करण्यात आली. लवकरच आरटीओ विभागामध्ये भरती होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी परत आपल्या मूळ जागी कार्यरत होतील असे मंत्री महोदयांकडून सांगण्यात आले.
सदरची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीला श्री.माधव कुसेकर,उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकी संचालक राज्य परिवहन महामंडळ, श्री दिनेश महाजन महाव्यवस्थापक (बांधकाम), कार्यकारी अभियंता बांधकाम मुंबई प्रदेश, श्री घोडे विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग, आर्किटेक श्री हुजेफर भोल, सुरज शेट्टी व इतर संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.