सिंधुदुर्ग,दि.१ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ६७ लिपिक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांसाठी गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शासनाने नव्याने निर्धारित केलेल्या निवड निकषानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण ६७ पदांपैकी ७० टक्के पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून, उर्वरित ३० टक्के पदांसाठी जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींसाठी बँकेच्या भरतीत रोजगाराची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
परीक्षा शुल्क ₹९००
भरती परीक्षेसाठी उमेदवारांना जीएसटीसहित ₹९०० परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑफलाइन पेमेंट पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाच्या खात्यावर जमा करावे लागणार आहे. उमेदवारांना बँकेच्या कोणत्याही शाखेत कार्यालयीन सुट्टी वगळता सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत परीक्षा शुल्क भरता येईल.
परीक्षा शुल्क NEFT, IMPS किंवा Account Transfer द्वारेही भरता येणार आहे. शुल्क भरल्यानंतर मिळालेला ट्रान्झॅक्शन आयडी ऑनलाइन अर्जात नमूद करणे तसेच पैसे भरल्याचा काऊंटर पार्ट अथवा ट्रान्झॅक्शनचा फोटो/स्क्रीनशॉट अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य
लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरताना अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे अनिवार्य आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी केवळ सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज सादर करावा.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि संगणकीकृत पद्धतीने TCS कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी भरतीची जाहिरात, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता व अन्य माहिती अचूकपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना तांत्रिक अथवा अन्य अडचण आल्यास TCS हेल्पलाईन क्रमांक ७९९६१०४१११ वर संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कोणतीही घाई न करता भरतीची अधिकृत जाहिरात व सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून १७ सप्टेंबरपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी केले आहे.