सिंधुदुर्ग : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक यांचा ३ व ४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

शेअर करा

मतदान केंद्रांची पाहणी; मतदार नोंदणी अधिकारी कामकाजाचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग,दि.१ सप्टेंबर

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या दि. ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेण्यात येणार आहेत.

दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित कामकाज तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी घेण्यात येणार आहे.

त्यानंतर कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारनंतर कुडाळ तहसीलदार कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भातील सूचना, अडचणी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे म्हणणे यावेळी जाणून घेतले जाणार आहे. यानंतर कुडाळ येथील नगर पंचायत तसेच मतदान केंद्रालाही भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.

दि. ४ सप्टेंबर रोजी सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी करतील . या भेटीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधा आणि मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेण्यात येणार आहे.

शेअर करा