आर्थिक व्यवहार व बुकिंगसाठी ग्राहकांची वाढती गर्दी; एक कर्मचारी कमी असल्याने कामकाज संथ, नागरिकांना ताटकळत राहण्याची वेळ
तळेरे,दि.११ सप्टेंबर
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील पोस्ट कार्यालयात गेल्या १ महिन्यापासून एका कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमानी तसेच स्थानिक ग्राहकांची आर्थिक व्यवहारांसाठी आणि विविध पोस्टल सेवांसाठी वाढती गर्दी होत असताना मनुष्यबळाअभावी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
तळेरे हे पंचक्रोशीतील महत्त्वाचे व्यापार व वाहतूक केंद्र असल्याने गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येतात. यामुळे पोस्ट कार्यालयात आर्थिक व्यवहार, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट तसेच विविध बुकिंग सेवांसाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे. मात्र, एक कर्मचारी कमी असल्याने आर्थिक व्यवहार तसेच बुकिंगच्या कामासाठी ग्राहकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांची रेलचेल सुरू आहे. गावाकडे येणारे चाकरमानी तसेच स्थानिक नागरिक विविध व्यवहारांसाठी पोस्ट कार्यालयात येत आहेत. अशा वेळी कर्मचारी टंचाईमुळे सेवांना विलंब होत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी रक्षाबंधनाच्या काळातही राखी बुकिंगसाठी पोस्ट कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्या वेळी वाढलेल्या कामाचा ताण लक्षात घेऊन पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर पुन्हा ग्राहकांची संख्या वाढल्याने कर्मचारी टंचाईचा प्रश्न अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
एका कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीचा अतिरिक्त भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पडल्याने विविध सेवांचे कामकाज मर्यादित मनुष्यबळात सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना आपला क्रमांक येईपर्यंत रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून आर्थिक व्यवहार आणि पोस्ट बुकिंगसाठी वेळ लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह इतर ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत तळेरे पोस्टमास्तर यांच्याशी संपर्क साधला असता, रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या जागी पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप पर्यायी कर्मचारी उपलब्ध झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता तळेरे पोस्ट कार्यालयात तातडीने पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. तसेच आर्थिक व्यवहार, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट व बुकिंगसह सर्व सेवा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहक व ग्रामस्थांकडून होत आहे.